Thursday, March 29, 2007

विष्फुल्लिंग

पुण्यातला पाउस संपायचे नाव घेत नव्हता. सॉफ्टवेअर मधल्या बग प्रमाणे आता संपला असे वाटायला लागले की हा हजर! आणि तो पण नेमका शनिवार- रविवारी. बाकी पावसाचे आणि माझे काही वाकडे नाही. उलट पाउस मला आवडतो. फार आवडतो. [त्यामुळे कोणाला कोणी पावसासोबत आवडावे म्हणून झगडावे लागणार नाही.(संदर्भ: गारवा, मिलिंद इंगळे)]. फक्त एक गोची या पावसामुळे होते ती म्हणजे कॅमेरा बाहेर नेता येत नाही.

पाउस असा रुणझुणता!! घराच्या खिडकीतुन काढलेला फोटो
२-३ वीकेण्ड नंतर मात्र आमची सहनशक्ती संपली, म्हटले बस! आता काहीही झाले तरीही जायचेच! बोटांची खाज स्वस्थ बसू देत नव्हती. शनिवारी पहाटेच मी, प्रणव, आदित्य आणि वैभव निघालो. अत्तापर्यंत सासवड भाग हा default बनुन गेला होता. आमच्या घरच्यांनी तर "चुकली मुले, सासवडात!" अशी म्हणच तयार केली आहे.वातावरण आल्हादकारक होते, थोडा गारवा होता पण पावसाची लक्षणे नव्हती. दिवे घाटातून वर येईपर्यंत ७ वाजले होते. मागच्या वेळी इथे आलो होते तेव्हा दिसलेल्या क्वेल, शॉर्ट टोड आणि ब्लॅक स्टॉर्क च्या आठवणी मनात ताज्या झाल्या.

क्वेल


आजूबाजूचे पक्षी, माणसे आपआपल्या कामात मश्गूल होती. सुरूवातीलाच वेडा राघू आणि होला यांनी जवळून मस्त पोझेस दिल्या.

वेडा राघू



होला

पुढे एका तळ्याजवळ आम्हाला एक सिंगिंग बुशलार्क दिसला. प्रणव आणि वैभव पुढे गेले. फोटोसेशन आटपून आम्हिही निघलो.



सिंगिंग बुशलार्क

थोड्याच अंतरावर ते दोघे एका बाभळीच्या झाडाकडे एकटक बघत होते.
"ए! काय सापडले?""
शू !!!!!!!!!!!!!!!!!!!!"
जास्त काही न बोलता आम्ही पण त्या झाडाकडे बघायला लागलो. त्यावर पांढऱ्या पोटाचा विष्फुल्लिंग (White bellied Minivet) बसला होता.त्याच्या चोचीमधे एक अळी होती. मी कॅमेरा घेउन लगेच सटासट फोटो काढले. बराच वेळ तो तिथे बसून होता आणि ती अळी खात नव्हता, त्यावरुन आम्हाला शंका आली की याचे घरटे इथेच आहे.



पांढऱ्या पोटाचा विष्फुल्लिंग (नर)
मग जास्त आवाज न करता बाजुच्या एका झुडुपामागे आम्ही जाऊन बसलो. थोड्यवेळाने त्याची भीती बुजली आणि तो त्याच्या घरट्यात शिरला.


काय अशक्य ठिकाणी, अशक्य वातावरणानुरुप(Camouflaged) घरटे बांधले होते. कोणाला ते झाड दाखवले आणि सांगितले "इथे एक घरटे आहे, ते शोध!". तर त्याने ते घरटे शोधण्याची प्रोबॅब्लिटी, भारत - ऑस्ट्रेलिया मॅचमधे, भारत जिंकण्याच्या प्रोबॅब्लिटीपेक्षा कमी असेल.पाणी आणि जमिनीपासुन १०-१५ फूट उंचीवर एका तिचक्यावर (जिथे दोन फांद्या फुटतात तो "बेचका" आणि जिथे तीन फांद्या फुटतात तो "तिचका") मावळ्याच्या पगडी सारखे (सायबच्या भाषेत सॅडल नेस्ट म्हणजे खोगीर घरटे) घरटे होते.



त्या पक्षाचे पोट जेमतेम बसेल एवढा त्याचा आकार होता. ते घरटे बनवण्यासाठी छोट्याछोट्या काटक्यांचा वापर केला होता. पण त्या प्रकारच्या घरट्यांमधे (आयोरा, चश्मेवाला) सर्रास वापरली जाणारी कोळ्याची जाळी मात्र फार कमी होती. त्या घरट्यात एक अंडे आणि एक पिलू होते. मादी पूर्ण वेळ घरट्यात बसुन होती. नर तिला अळ्या, नाकतोडे आणून खायला घालत होता.



घरटे

पिलू अजुन लहान होते,त्याला भरवले जात नव्हते.११-११.३० च्या सुमारास भरून यायला लागले, त्यामुळे सटकण्याच्या निर्णयावर शिक्कमोर्तब झाले.

पांढऱ्या पोटाचा विष्फुल्लिंग (मादी)

रेंज आल्यावर पांडे सरांना फोन केला आणि या घरट्याबद्दल सांगितले तेव्हा ते म्हणाले या पक्षाबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. याचा अभ्यास करायला हवा. त्यानंतर आम्ही दर शनिवार रविवार तेथे जाउन टाइम बजेटिंग करु लागलो.




टाइम बजेटिंग म्हणजे नर आणि मादी किती वेळ घरट्यावर असतात? किती वेळा अन्न आणले जाते? कोण भरवते? अंडी कोण उबवते? नर किती वेळ गाणी म्हणतो? यासगळ्याचा आलेख.











२-३ आठवडे मस्त काम चालु होते, पिलू चांगलेच मोठे झले होते. नर आणि मादी दोघांचीही त्या पिलाला भरवता भरवता "पुरे ! वाट" लागत होती.
पण या सगळ्या दिवसात बाकीचे फोटो काढले जात होते.(फोटोसाठी वर पहा.) एके दिवशी ठरवले, याचा एकतरी चांगला फोटो हवाच. त्यासाठी बुधवारी पहटेच आम्ही तिकडे पोहोचलो. ( मंगळवारी पाउस पडला नव्हता, आणि पडयाची चिन्हे नव्हती. ऑफिसमधे सकळी लवकर कोणतीहि मिटिंग नव्हती, म्हणून बुधवार.) मस्त उन पडले होते. आता आम्हाला नराची बसण्याची एक जागा माहित झाली होती. तिथे जाउन बसलो. थोड्याच वेळात नर तिथे आला . झकासपैकी फोटो घेतले आणि नंतर टाइम बजेटिंग करण्यासाठी घरट्याजवळ गेलो.


मादी तिथे होती, नर थोड्यावेळाने एक रसरशीत आळी घेउन आला, पण पिलाने नेहमी प्रमाणे चिवचिवाट केला नाही आणि ते उठले ही नाही. नर आणि मादी सारखे घरट्याकडे जायचे, चोच पुढे करायचे आणि थोड्यावेळाने स्व:ताच तो घास खाउन टाकायचे. थोड्यावेळाने त्यांनाही समजले की ते पिलू गेले आहे.या घरट्याचा असा करुण अंत बघून आम्हाला गलबलून आले.



पण हा तर निसर्ग नियमच आहे, जो जगण्यासाठी योग्य नाही तो टिकत नाही.बहुधा या जोडीचे हे पहिलेच घरटे असेल. पुढच्या वेळी त्याचे घरटे नक्की यशस्वी होइल अशी आशा करत आम्ही तिथून निघलो ते पुढच्या वर्षी अजुन जास्त घरटी शोधण्याची स्वप्ने बघतच!!!!!