Wednesday, August 23, 2006

YUVARAAJ

एकदा दाण्याबरोबर(Sarang Dani) सिंहगडावर फिरायला गेलो होतो. त्यावेळी टिळक वाड्याजवळ एका शेवरीच्या दांडीवर एक पक्षी बसून फार सुंदर गात होता. त्याच्याकडे लक्ष जाणे सहाजिकच होते. पक्षी प्रेमाचे ते सुरुवातीचे दिवस असल्यामुळे नुसत्या आवजावरुन पक्षी ओळखणे जरा अवघडच काम होते. उजेड कमी होता. त्याचे रंग दिसत नव्हते, पण लक्षात राहिला तो त्याचा तुरा.
घरी येउन पुस्तक धुंडाळणे सुरु झाले. पण अश्या वर्णनाचा (तुरा असलेला चिमणी एवढा) पक्षी त्यावेळी माझ्याकडे असलेल्या पुस्तकात (सालीम अलींच्या पुस्तकाचा छोटेखानी मराठी अनुवाद) नव्हता. त्यानंतर थोड्यादिवसांनी एका रद्दीच्या दुकानात मिलिंद गुप्त्यांचे "सकाळ" मधे आलेल्या लेखांचे पुस्तक दिसले. २० रुपयांमधे ते पटकन उचलले. (हा रद्दीवाला फार कामाचा माणूस आहे. त्याने मला "जीव्ज" ची सहा पुस्तके फक्त ५० रुपयात दिली आहेत. असो.) घरी आल्यावर ते पुस्तक आधाश्यासारखे वाचत सुटलो. त्यात तिसऱ्या पक्ष्याबद्दल वाचतान एकदम ट्यूब पेटली. अरे हाच तो पक्षी जो आपण सिंहगडावर बघितला होता. त्याचे नाव होते "युवराज". किती सार्थ नाव! साहेबाच्या भाषेत याला "Crested Bunting" असे दुबळे नाव आहे.

य़ुवराज(नर)

काळे कुळकुळीत पोट, चॉकलेटी पाय, चिलखत घातल्याप्रमाणे दिसणारे ब्रॉंझ रंगाचे पंख, जिरेटोपाची आठवण करुन देणारा तुरा, त्याचे ते छाती फ़ुगवून बसणे, डोळ्यातली ती चमक आणि एकूणच वागणे, सगळे एखाद्या "बिगडेदिल शहजाद्या" सारखे. हे वर्णन झाले नराचे.
य़ुवराज(मादी)

मादी आपली बापुडी एखाद्या गरीब घरच्या शालीन, सोज्जवळ मुलीसारखी असते. रंगाने अगदी चिमणी, न तुरा, न तो डौल. भपकेबाज पणाचा पूर्ण अभाव. म्हणूनच की काय ही त्या राजपुत्रा मनात भरते. अगदी परस्परानुकुल जोडा आहे हा. अशा ह्या पक्षाला जो\जी एकदा पाहिल, आणि ह्याच्या प्रेमात न पडेल, तर ते त्याच्या/तिच्या मधील सौंदर्याभिरुचीचा अभाव दाखवते.मूर्तीमंत सौंदर्य़

त्यानंतर सिंहगड व्हॅलीमधे ह्याला मी 'य' वेळा, पोट्भरुन पाहिले पण एकही चांगला फोटो मिळाला नाही.
हा तसा मिश्राहारी पक्षी आहे. टणटणीची फळे, टोळ,गवताचे कोंब, धान्य ह्या सगळ्यांचा त्याच्या आहारात समावेश असतो. बहुधा हा पक्षी जोडीनेच फिरतो. व्हॅलीमधे ओढ्याच्या कडेला जे झोपडे आहे, तिथे जेव्हा धान्य आणुन टाकले जाते, तेव्हा युवराज आणि चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया (सालीम अलींची चिमणी) हमखास दिसतात. घाट, डोंगर उतार इथे ह्यांचा वावर असतो.


खाद्य

ह्यांचा विणीचा हंगाम श्रावण-भाद्रपदात असतो. डोंगर उतरावर एखाद्या कपारीत झुडुपाच्या मागे, पाने, गवत, गवताची मुळे वापरुन तयार केलेले कप सारखे घरटे शोधणे हे जवळ जवळ अशक्यप्राय काम आहे. नर आणि मादी दोघेही मिळुन घरटे बांधतात.


प्रणयक्रीडा

घरट्यात हिरवट पिवळ्या रंगाची व त्यावर जांभळट चॉकलेटी डाग असलेली २-३ अंडी असतात. अंडी उबवण्याचे काम फक्त मादी करते.


घरटे

त्या काळात नराने घरट्याच्या आजुबाजुला आपली हद्द निश्चित केलेली असते व तो त्या हद्दीवर असलेल्या मोक्याच्या ठिकाणी बसून गात असतो. हे गाणे म्हणजे त्याच्य्या अधिराज्याची जाहिरात. त्या हद्दीत जर कोणी दुसरा नर आला तर त्याचा पाठलाग करुन त्याला हुसकावुन लावण्यात येते. ह्यांच्या साठी घाटातील रस्त्याच्या कडेच्या कपारी म्हणजे जणू सॉफ्टवेअर इंजिनीयर साठी औंध. ह्या बायोलॉजिकल मॅग्नेटिझम मुळे पावसाळ्यात घाटात रस्त्याच्या कडेला बऱ्याच वेळा हे लढाई करताना दिसतात.सीमारेषेचे रक्षण

बहुतेक सगळ्या बंटिगचा अंड्यातून पिले बाहेर पड्ण्याचा सक्सेस रेट कमी आहे. फार जोराचा पाऊस झाला तर अंडी उबत नाहीत. पण अंडी उबली नाहीत तर त्याच हंगामात दुसरे घरटे पण केले जाते. पिले बाहेर आल्यावर नर पिलांसाठी चारा आणतो. मादी बहुतेक वेळा घरट्यातच बसुन असते. पिलांच्या वाढीसाठी आवश्यक असे प्रोटिन रिच खाद्य म्हणजे, किडे त्यांना भरवले जाते. नर आणि मादी बऱ्याच वेळा बारक्या फळांवर ताव मारतना दिसतात.पिले दिसायला एकदम मादी सारखी असतात.
ताव

नवीन कॅमेरा घेतल्यापासून ह्याचा फोटो काढण्याची इच्छा बळावत चालली होती. मला ह्याचे फोटो काढल्याची स्वप्ने पडत होती. आणि एकदाचा स्वप्नपूर्तीचा तो शनिवार उजाडला. मी, प्रणव, आदित्य, अमित आणि पांडेसर सिंहगडाकडे चाललो होतो. घाटात एका कठड्यावर बसून युवराज गात होते. मी गाडी अगदी त्याच्यापासून ५ फूटावर नेउन थांबवली तरी स्वारी आपल्या गायनात मश्गूल. मी वेळ न दवडता कॅमेरा काढला, सटासट फोटो ओढले. गाडी वरून खाली उतरलो. त्यानंतर चांगली बॅग्राऊंड, कॅचलाईट, हेड टर्न असली फोटोग्राफिक थेरं सुचु लागली. प्रत्येक फोटो नंतर वाटायचे अजून चांगला फोटो येइल. हा गडी एखाद्या कसलेल्या मॉडेलप्रमाणे पोझ देत होता. एका फोटो मधे सगळ्या थेअरीज जमून आल्या आणि मी माझी तर्जनी आवरती घेतली.

Monday, August 14, 2006

RAATAVAA

पहिला पाउस पडून गेला होता. थोडी उघडिक मिळाली होती. त्यामुळे अजुन पाउस पडायच्या आधी कुठेतरी जाउन येण्यासाठी आम्ही फार आतुर होतो. ताम्हिणी भागात सलग ४ आठवडे जाउन आलो होतो आणि त्या भागात पाउसही जास्त असण्याची शक्यता होती.त्यामुळे सासवड कडे जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.
शनिवारी सकाळी मी आणि आदित्य पुण्यातून सासवडला पोहोचलो. प्रणव आणि जयदेव शिरवळवरुन प्रॅक्टिकल करुन सासवडला आले. अमितच्या घरी सगळे जमले आणि तिथून भटकंतीस प्रारंभ झाला.

(डावीकडून) गणेश, प्रणव, आदित्य, जयदेव आणि अमित सासवडच्या स्टॅण्डवर

नुकताच पाउस पडून गेल्यामुळे, दोनच दिवसापूर्वी उघडे बोडके दिसणारे ते डोंगर आता चक्क हिरवेगार झाले होते. उनही जास्त नव्हते. भतकंतीसाठी वातावरण एक नंबर होते. सुरूवातीलाच ब्लॅक बर्ड, बुशलार्क, बुलबुल, चीरक, दयाळ हजेरी लावून गेले. पावसामुळे ह्या सर्वांच्या उत्साहाला उधाण आले होते. त्यांच्या गायनामुळे भटकंतीला मस्त पार्श्वसंगीत लाभले. कस्तूर (मलबार व्हिस्त्लिंग थ्रश) बेफिकीर शीळ घालत होते, कारुण्य कोकिळ मधून मधून त्यांना साथ देत होते. फिरता फिरता कधी दुपार झाली ते कळालेच नाही.

पुरंदर

ह्या फिरण्यात आम्हाला जवळपास १५-२० साळिंदराची बिळे दिसली. पण त्यात एकही साळिंदर नव्हते. सगळ्या बिळांच्या बाहेर काहीतरी जाळल्याचे दिसले. साळिंदराच्या शिकारीची ही स्टॅण्डर्ड पद्धत आहे. काहीतरी जाळून धूर बिळात सोडायचा, त्यामुळे ते बाहेर निघते. बाहेर निघताच त्याच्या डोक्यात दगड घालायचा. बहुतेक एक शिकारी टोळी नुकतीच या भागात येउन गेली होती.बऱ्याच ठिकणी खोकडाच्या विष्ठा दिसल्या. ४-५ वेळा चिंकारा पण दिसले.
साळिंदराचे बीळ (इनसाईड ऍण्ड आऊटसाईड फ्रॉम इनसाईड)

बांधुन आणलेला वडापाव खात आम्ही एका झाडाखाली बसलो होतो. समोरच्या निवडुंगावर एक होला येउन बसला. मस्त पोझ दिली होती. जणू काहि फोटोसेशन साठीच आला होता. त्याचा जवळून फोटो काढण्यासाठी दबकत दबकत मी पुढे सरकत होतो, पावलांचा आवाज न होऊ देता, खाली वाकुन. होला लेन्सच्या टप्प्यात जवळपास आला होता. अजुन थोडे जवळ जाण्यासाठी मी एक पाऊल पुढे टाकले तर, फर्रर्रर्र आवाज करत पायातून काहितरी उडाले. माझ्या **** कपाळात!!!!! काय होते ते? क्वेल. पण क्वेल तर सरळ वर उडते आणि मग पुढे जाते. पण ह्या पठ्ठ्याने उडण्यासाठी जो काही मार्ग निवडला होता, तो जर ट्रेस करायचा झाला तर क्रिकेट मधे वापरल्या जाणाऱ्या हॉक आय ला सुद्धा घाम फुटला असता. तो थोडा पुढे गेल्यावर त्याच्या पंखावरचे आरसे दिसले आणि एकंदरीत जिझ्झवरुन लक्षात आले की हा तर "रातवा".

रातवा

मी त्याच्या मगे कॅमेरा सरसावत पळालो. पण तो रातवा शेजारच्या झाडीत कुठेतरी गडप झाला. तो ज्या ठिकाणावरुन उडाला तिथे बघितले तर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. मी जोरात ओरडलो, "आईशप्पथ! प्रणव! नाईटजार चे घरटे".


अंडी

सगळे जण पळत त्या ठिकाणी आले. त्या घरट्यात दोन अबोली रंगाची अंडी होती. ती बघून आमची खात्री झाली की तो रातवा परत इथे येणार. आम्ही थोडे मागे जाउन एका झुडुपाच्या आडोश्याला कॅमेरे परजत बसलो.
"रातवा" किंवा "रात्रिंचर" (नाइटजार) हा तसा गावाकडील लोकांना माहीत असलेला पक्षी आहे. त्याचा आढळ शहरात नसल्याने तो शहरातील लोकांना माहीत नाही. त्याच्या नावावरुनच कळते की हा निशाचर पक्षी आहे. दिवसा तो कुठेतरी दगडात किंवा झाडाच्या आडव्या फांदीवर स्थिर बसून राहतो. त्याचा रंगपण आजूबाजूच्या वातावरणाशी इतका अनुकूल झालेला असतो की आपण त्याच्यापासुन एक दोन फुटावर असलो तरी तो आपल्याला दिसत नाही. त्यांच्या मोठ्या जिवणीमुळे युरोपमधे त्यानां "गोटसकर" म्हणजे बकरीचे दूध पिणारे असे म्हणतात. पण हा समज चुकिचा आहे. त्यांचे अन्न प्रामुख्याने उडणारे किडे, चतुर हे आहे. रात्रिच्या वेळी उडत उडत ते शिकार करतात. त्यांच्या चोचीच्या बाजूला मिशा असतात, त्यांचा उपयोग किडे पकडण्यात सेन्सर म्हणून होतो. त्यांच्या नाकपुड्या चोचीवर विचित्र प्रकारे बसवल्यासारख्या असतात. असे असण्यामागे काय प्रयोजन असेल?त्यांचे डोळे बाजुला असून ते जवळपास ३६० डिग्री कव्हर करतात.
३६० डिग्री व्हिजन.
पण रातव्याचे सगळ्यात भारी वैशिष्ट्य म्हणजे त्याचे उडणे. रातवे उलटे पंख मारू शकतात. त्यामुळे ते कधीही, कसेही वळू शकतात. त्यांच्या या उडण्याच्या सवयीमुळे संस्कृतमधे या पक्ष्याला "नप्तृक" म्हणतात. ह्याचा शब्दशः अर्थ आहे "दगडाप्रमाणे खाली पडणारा". त्यांच्या या उडण्यामुळे रात्री महामार्गावर बऱ्याच वेळा गाडीसमोर येउनही त्यांना अपघात होण्याचे प्रमाण नगण्य आहे.
आपल्या भागात प्रामुख्याने तीन प्रकारचे रातवे सापडतात:
१. ईंडियन नाईटजार (रातवा)
२. जंगल नाईटजार (कापू)
३. सवाना/फ़्रॅन्कलिनचा रातवा
प्रथमदर्शनी सर्व रातवे सारखेच दिसतात. पण थोड्या सरावाने त्यांच्यातला फरक ओळखता येऊ शकतो. पण त्यांचे आवाज ऐकले तर ते लगेच ओळखता येतात.

जवळपास १५-२० मिनिटांनी तो रातवा परत आला. तो ईंडियन नाईटजार होता. ती मादी होती. कारण तिच्या शेपटी वर पांढरे ठिपके नव्हते. ती घरट्यावर बसताना धक्क्यामुळे एक अंडे पुढे ढकलले गेले. फोटो काढण्यासाठी ही एक नामी संधी होती. मी कोपरावर सरपटत जाउन त्याचे फोटो घेतले. थोड्यावेळाने त्या मादीने ते अंडे ढकलून आपल्या पोटाखाली घेतले.
रातवा आणी त्याचे अंडे

संध्याकाळ होत आली होती, आभाळही भरून आले होते. आख्खा डोंगर उतरून खाली जायचे होते.त्यामुळे आम्ही परतण्याचा निर्णय घेतला.पण त्या ठिकाणावरून पाय निघत नव्हता. जाता जाता गणेशने दुर्बीणीतून त्या रातव्याकडे पाहिले. त्याला काहितरी हलताना दिसले. नीट बघितले तर त्या रातव्याच्या अंगावर दोन पैसे फिरत होते. ते दृश्य फारच विहिंगम होते. ते पैसे आपल्याच धुंदीत होते. फिरत फिरत ते त्य रातव्याच्या डोक्याजवळ आले, आम्हाला वाटले आता तो रातवा त्यांना खाणार, पण तो दगडासारखा ढिम्म बसुन होता. त्या पैश्यांनाच शेवटी कळाले की आपण कुठेतरी चुकीच्या ठिकाणी आहोत. ते पटकन त्याच्या अंगावरुन उतरले. आम्ही पण त्यांचे अनुकरण करुन परतीच्या वाटेला लागलो.

रातवा आणि पैसे

फ़्रॅन्कलिनचा रातवा

(हे फोटो मी सिंहगड व्हॅली मधे काढले होते.)