एकदा दाण्याबरोबर(Sarang Dani)
सिंहगडावर फिरायला गेलो होतो.
त्यावेळी टिळक वाड्याजवळ एका शेवरीच्या दांडीवर एक पक्षी बसून फार सुंदर गात होता.
त्याच्याकडे लक्ष जाणे सहाजिकच होते.
पक्षी प्रेमाचे ते सुरुवातीचे दिवस असल्यामुळे नुसत्या आवजावरुन पक्षी ओळखणे जरा अवघडच काम होते.
उजेड कमी होता.
त्याचे रंग दिसत नव्हते,
पण लक्षात राहिला तो त्याचा तुरा.
घरी येउन पुस्तक धुंडाळणे सुरु झाले. पण अश्या वर्णनाचा (तुरा असलेला चिमणी एवढा) पक्षी त्यावेळी माझ्याकडे असलेल्या पुस्तकात (सालीम अलींच्या पुस्तकाचा छोटेखानी मराठी अनुवाद) नव्हता. त्यानंतर थोड्यादिवसांनी एका रद्दीच्या दुकानात मिलिंद गुप्त्यांचे "सकाळ" मधे आलेल्या लेखांचे पुस्तक दिसले. २० रुपयांमधे ते पटकन उचलले. (हा रद्दीवाला फार कामाचा माणूस आहे. त्याने मला "जीव्ज" ची सहा पुस्तके फक्त ५० रुपयात दिली आहेत. असो.) घरी आल्यावर ते पुस्तक आधाश्यासारखे वाचत सुटलो. त्यात तिसऱ्या पक्ष्याबद्दल वाचतान एकदम ट्यूब पेटली. अरे हाच तो पक्षी जो आपण सिंहगडावर बघितला होता. त्याचे नाव होते "युवराज". किती सार्थ नाव! साहेबाच्या भाषेत याला "Crested Bunting" असे दुबळे नाव आहे.

य़ुवराज(नर)
काळे कुळकुळीत पोट, चॉकलेटी पाय, चिलखत घातल्याप्रमाणे दिसणारे ब्रॉंझ रंगाचे पंख, जिरेटोपाची आठवण करुन देणारा तुरा, त्याचे ते छाती फ़ुगवून बसणे, डोळ्यातली ती चमक आणि एकूणच वागणे, सगळे एखाद्या "बिगडेदिल शहजाद्या" सारखे. हे वर्णन झाले नराचे.


य़ुवराज(मादी)
मादी आपली बापुडी एखाद्या गरीब घरच्या शालीन, सोज्जवळ मुलीसारखी असते. रंगाने अगदी चिमणी, न तुरा, न तो डौल. भपकेबाज पणाचा पूर्ण अभाव. म्हणूनच की काय ही त्या राजपुत्रा मनात भरते. अगदी परस्परानुकुल जोडा आहे हा. अशा ह्या पक्षाला जो\जी एकदा पाहिल, आणि ह्याच्या प्रेमात न पडेल, तर ते त्याच्या/तिच्या मधील सौंदर्याभिरुचीचा अभाव दाखवते.


मूर्तीमंत सौंदर्य़
त्यानंतर सिंहगड व्हॅलीमधे ह्याला मी 'य' वेळा, पोट्भरुन पाहिले पण एकही चांगला फोटो मिळाला नाही.
हा तसा मिश्राहारी पक्षी आहे. टणटणीची फळे, टोळ,गवताचे कोंब, धान्य ह्या सगळ्यांचा त्याच्या आहारात समावेश असतो. बहुधा हा पक्षी जोडीनेच फिरतो. व्हॅलीमधे ओढ्याच्या कडेला जे झोपडे आहे, तिथे जेव्हा धान्य आणुन टाकले जाते, तेव्हा युवराज आणि चेस्टनट शोल्डर्ड पेट्रोनिया (सालीम अलींची चिमणी) हमखास दिसतात. घाट, डोंगर उतार इथे ह्यांचा वावर असतो.

खाद्य
ह्यांचा विणीचा हंगाम श्रावण-भाद्रपदात असतो. डोंगर उतरावर एखाद्या कपारीत झुडुपाच्या मागे, पाने, गवत, गवताची मुळे वापरुन तयार केलेले कप सारखे घरटे शोधणे हे जवळ जवळ अशक्यप्राय काम आहे. नर आणि मादी दोघेही मिळुन घरटे बांधतात.

प्रणयक्रीडा
घरट्यात हिरवट पिवळ्या रंगाची व त्यावर जांभळट चॉकलेटी डाग असलेली २-३ अंडी असतात. अंडी उबवण्याचे काम फक्त मादी करते.

घरटे
त्या काळात नराने घरट्याच्या आजुबाजुला आपली हद्द निश्चित केलेली असते व तो त्या हद्दीवर असलेल्या मोक्याच्या ठिकाणी बसून गात असतो. हे गाणे म्हणजे त्याच्य्या अधिराज्याची जाहिरात. त्या हद्दीत जर कोणी दुसरा नर आला तर त्याचा पाठलाग करुन त्याला हुसकावुन लावण्यात येते. ह्यांच्या साठी घाटातील रस्त्याच्या कडेच्या कपारी म्हणजे जणू सॉफ्टवेअर इंजिनीयर साठी औंध. ह्या बायोलॉजिकल मॅग्नेटिझम मुळे पावसाळ्यात घाटात रस्त्याच्या कडेला बऱ्याच वेळा हे लढाई करताना दिसतात.


सीमारेषेचे रक्षण
बहुतेक सगळ्या बंटिगचा अंड्यातून पिले बाहेर पड्ण्याचा सक्सेस रेट कमी आहे. फार जोराचा पाऊस झाला तर अंडी उबत नाहीत. पण अंडी उबली नाहीत तर त्याच हंगामात दुसरे घरटे पण केले जाते. पिले बाहेर आल्यावर नर पिलांसाठी चारा आणतो. मादी बहुतेक वेळा घरट्यातच बसुन असते. पिलांच्या वाढीसाठी आवश्यक असे प्रोटिन रिच खाद्य म्हणजे, किडे त्यांना भरवले जाते. नर आणि मादी बऱ्याच वेळा बारक्या फळांवर ताव मारतना दिसतात.पिले दिसायला एकदम मादी सारखी असतात.


ताव
नवीन कॅमेरा घेतल्यापासून ह्याचा फोटो काढण्याची इच्छा बळावत चालली होती. मला ह्याचे फोटो काढल्याची स्वप्ने पडत होती. आणि एकदाचा स्वप्नपूर्तीचा तो शनिवार उजाडला. मी, प्रणव, आदित्य, अमित आणि पांडेसर सिंहगडाकडे चाललो होतो. घाटात एका कठड्यावर बसून युवराज गात होते. मी गाडी अगदी त्याच्यापासून ५ फूटावर नेउन थांबवली तरी स्वारी आपल्या गायनात मश्गूल. मी वेळ न दवडता कॅमेरा काढला, सटासट फोटो ओढले. गाडी वरून खाली उतरलो. त्यानंतर चांगली बॅग्राऊंड, कॅचलाईट, हेड टर्न असली फोटोग्राफिक थेरं सुचु लागली. प्रत्येक फोटो नंतर वाटायचे अजून चांगला फोटो येइल. हा गडी एखाद्या कसलेल्या मॉडेलप्रमाणे पोझ देत होता. एका फोटो मधे सगळ्या थेअरीज जमून आल्या आणि मी माझी तर्जनी आवरती घेतली.