Friday, January 11, 2008

अग्निपंख

सकाळी उठून पळायला जाण्यासाठी दार उघडले, सकाळ खाली पडला. "फ्लेमिंगो आले.." ही बातमी अन पाण्यावर पळणाऱ्या फ्लेमिंगोंच्या थव्याचा फोटो.........
माझ्या आठवणी प्रमाणे जवळपास दरवर्षी ही बातमी असतेच, फोटो पण तसाच.....



या फ्लेमिंगोच एवढं कौतुक का? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर नक्कीच तुम्ही फ्लेमिंगो बघितला नाहिये.ती नाजुकता, कमनीयता...


फ्लेमिंगो, मराठीत रोहित किंवा अग्निपंख. पंखांचा रंग ज्वाळेसारखा लाल म्हणून अग्निपंख. उडत जाताना ज्वाळाच उडत जातेय की काय असे वाटते म्हणून Flamingo (Flame is going).
ग्रामीण भागात यांचे एक फार मजेशीर नाव प्रचलित आहे, काश्मिरी बगळा.



महाराष्ट्रात किंवा भारतात दोन प्रकारचे फ्लेमिंगो सापडतात. पहिला ग्रेटर आणि दुसरा लेसर. लेसर फ्लेमिंगो हे खाऱ्या पाण्यात असतात. त्यांना महाराष्ट्रात बघायचे असेल तर मुंबई जवळच्या शेवडी बंदरापाशी जावे लागते. तेथे ते हजारोंच्या संख्येने येतात. (मुंबईच्या वृत्तपत्रांमधे यांचा फोटो येत असतो, पहिल्या पानावर...)

बाकी महाराष्ट्रामधे जे फ्लेमिंगो असतात ते ग्रेटर. नावाप्रमाणे त्यांचा आकार मोठा असतो. पुण्याजवळ, भिगवण, साताऱ्याजवळ मायणी, खिरेश्वर तलाव (हरिश्चंद्रगडाकडे जाताना लागणारा जलाशय) इत्यादी हे येतात. येतात म्हणजे कुठून? का?
मुख्यत्वे हे येतात गुजरात मधल्या कच्छ च्या आखातातून. बाकी इराण, अफगाणिस्तानातून हे आल्याच्या नोंदी आहेत. का येतात याचे नक्की कारण देता नाही येणार. उत्तरेकडे जास्त थंडी असते म्हणून एक वेळ अन्नाच्या शोधात हे येत असतील. पण गुजरात मधुन येणाऱ्यांचे काय?
कच्छ्च्या आखातामधे यांचे प्रजननाचे काम चालते. तिथे समुद्र किनाऱ्यावर मातीचे छोटे ढिगारे (माउंड) करुन त्यावर हे अंडी घालतात. प्रजननासाठी ती अगदी सुरक्षित जागा आहे. पण पिल्ले मोठी झाल्यावर तिथे अन्न कमी असल्यामुळे हे आपल्याकडे येत असावेत. प्रजननासाठी हे परत तिकडेच जातात.

एक फारच रोचक माहिती पांडे सरांनी परवा सांगितली यांच्या येण्याबद्दल. ओक्टोंबर च्या सुरुवातीला एखाद दुसरा फ्लेमिंगो आलेला दिसतो, २-३ दिवसांनी तो गायब होतो आणि परत १५-२० दिवसानंतर त्यांचा थवा येतो.

हे नेहमी कळपाने रहाणारे पक्षी आहेत. साधारणपणे १५-२० ते १५००० एवढा मोठा थवा असु शकतो. पाण्याच्या कडेला किंवा पाण्यात उभे राहून चोच पायात घेउन यांचे अन्न शोधणे चालू असते. यांची चोच विशिष्ट प्रकारे विकसित झाली आहे. तिच्यावर कंगव्यासारखे दात आलेले असतात. (दात हा चुकीचा शब्द आहे, कारण कुठल्याच पक्ष्याला दात नसतात.) याचा उपयोग ते चाळणी सारखा (पाणी बाहेर टाकणे व अन्न तोंडात ठेवणे )करतात.

यांचे अन्न शिंपले आणि निळ्या हिरव्या रंगाची अल्गी. ह्या दोन्ही पासून त्यानां मुबलक प्रमाणात बिटा-केरोटीन हे जीवनसत्व मिळते. त्यामुळेच त्यांचा रंग गुलाबी होतो. प्राणिसंग्रहालयातील फ्लेमिंगोंचा रंग याच्या अभावामुळे गुलाबी होत नाही.


खुपदा हे आपला एक पाय दुमडुन पोटाशी घेतात. पायावर पिसे नसल्याने,तिथुन जास्त प्रमाणात उष्णता हरवते. ती कमी हरवावी म्हणून पाय दुमडुन पोटाशी घेणे. याच्या उलटा प्रकार उन्हाळ्यात दिसतो. बगळे, चमचे यांच्या पिल्लांना उन्हाचा फार त्रास होतो. शरीरातील उष्णता लवकर कमी व्हावी म्हणून ते आपल्या पायांवर विष्ठा करतात.

हे दिसायला एवढे सुरेख असले तरी त्यांचा आवाज तितकासा सुरेख नसतो. सॅक्सोफोन मधे पाणी आणि ४-५ गोट्या टाकुन तो वाजवल्यावर जसा आवाज येइल तश्या आवाजात ह्यांचा वार्तालाप चालु असतो. अखंड.


मध्यंतरी मुंबईला झालेल्या यांच्या शिकारीवरुन बरेच वादळ उठले होते. ती शिकार लोकांच्या नजरेत आली म्हणून. बाकी वेळी राजरोस पणे शिकारी चालू असतात यांच्या. भिगवणला आंध्र प्रदेशहून मासेमारी साठी आलेल्च्या लोकांनी जलाशयात येणाऱ्या फ्लेमिंगोंची शिकार करुन खाणे सुरु केले आहे.
ह्या गोष्टी गंभीर आहेत खऱ्या, पण त्याहून ही गंभीर बाब आहे त्यांची वस्तिस्थाने कमी होणे.
मुंबईला शेवडीला एक मोठा पूल बांधला जात आहे, जो फ्लेमिंगोंच्या वस्तीवरुन जाणार आहे.......
भिगवणला येणाऱ्या फ्लेमिंगोंची संख्या ५० % ने कमी झाली आहे.........

2 comments:

Yogesh said...

surekh :)
tumhala parat pahoon khooop anand jhala. :) keep writing

Anonymous said...

nice. evadhe photo kadhto, jara blog dast lihi....lai bhari