Monday, February 04, 2008

तुरुमती











महाराष्ट्रातील दख्खन च्या पठारावरील हे एक खेडेगाव. जिथे जीवन अजुनही गजबजाट, गोंगाट रहीत आहे. घाई कसली ती नाहीच. पण आधुनिकीकरण इथेही आले आहे. शेतात नांगरणी साठी ट्रॅक्टर सर्रास वापरला जाऊ लागला आहे. या बदलाला बगळ्या सारख्या पक्षांनीही सहज स्वीकारले आहे.
दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गाई म्हशी, बकऱ्या आणि कोंबड्या पाळल्या जातात. तसेच पोल्ट्री सारखे कुटिर उद्योगही येथे जोम धरु लागले आहेत. अशा छोट्या गावात किमान एक तरी पोल्ट्री असतेच. या पोल्ट्री च्या बाजुनी सावलीसाठी निलगिरी सारखी झाडे लावली जातात. पोल्ट्री तील टाकाऊ पदार्थ कावळ्यांना इथे सहज उपलब्ध असल्यामुळे त्यानीं येथील निलगिरीच्या झाडांवर अनेक घरटी बांधली आहेत.
या घरट्यांचे निरीक्षण करत असताना आम्हाला एका घरट्यात पांढऱ्या रंगाचे पिल्लु दिसले. कावळ्याच्या पिल्लांचा रंग काळाच असतो. त्यामुळे आमची उत्सुकता चाळवली गेली. आजुबाजुच्या झाडावर शोध घेतला असता, फांद्याच्या गर्दीत विसावा घेणारे हे शिकारी पक्षाचे ऎटबाज जोडपे दिसले. याचे नाव आहे तुरुमती ससाणा किंवा रेड हेडेड फाल्कन.
















भारतात आढळणाऱ्या ससाण्यांपैकी हा आकाराने सगळ्यात लहान ससाणा. हा उजाड मोकळ्या किंवा शेतीप्रधान भागात दिसतो. हा भारतभर तुरळकपणे आढळतो. ह्याची संख्या गेल्या काही वर्षात कमी झाली आहे.
असा हा अत्यंत वेगाने उडणारा पक्षी काय खातो?, घरटे कसे बांधतो?, किती पिल्ले घालतो?, पिल्लांना काय खायला देतो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याची दुर्मिळ संधी आयती चालुन आली होती, आणि ती आम्ही सहजासहजी सोडणार नव्हतो. तात्काळ तिथे मचाण बांधण्याचा निर्णय आम्ही घेतला.
पुर्वी मचाणावर बसुन खूप शिकारी केल्या गेल्या आहेत, पण मचाण बांधुन त्यावरुन पक्षी जीवनाची निरीक्षणे खूपच कमी वेळा नोंदवली गेली आहेत.



















घरट्याजवळ मचाण बांधताना खूप काळजी घ्यावी लागते. पक्षी घरटे बांधत असताना अजिबात मचाण बांधत नाहीत. पक्षी ते घरटे सोडु शकतात. मचाणावर बसून चित्रीकरण करायचे आणि निरीक्षणे नोंदवायची असल्यामुळे ते भक्कम असणे गरजेचे होते. पाहता पाहता मचाण ३० फूट उंचीचे झाले. त्यावर बसुन कॅमेरा व दुर्बिणीच्या सहाय्याने घरट्याच्या आत डोकावणे शक्य झाले होते.













मचाणावर लपण लावून आम्ही बसलो. पिले लहान होती. आइ वडील निसंकोचपणे घरट्याकडे येत होते, आपले काम करत होते. पिलांचे वय जेमतेम एका आठवड्याचे होते. त्यांच्या अंगभर पांढरी पिसे होती. शिकारी पक्ष्याच्या पिल्लांचा सुरुवातीचा रंग असच पांढरा असतो. त्यांची वाढ झपाट्याने होत असते. वाढीबरोबरच त्यांची पिसे व रंग बदलत जात असतात.













तुरुमती ससाणा आपल्या पिलांना मांस खायला देत असतो.पिल्ले आकाराने लहान असतात तेव्हा त्यांना कमी अन्न लागते. त्यांची पचनसंस्था पूर्णपणे विकसित झालेली नसल्यामुळे पिल्लांना फक्त मऊ मांस भरवले जाते. भक्षाचे डोके पाय इत्यादी पचायला कठीण अवयव आई वडील स्वत:च खातात. शिकार दिवसातुन २-३ वेळा आणली जाते आणि शिकारीचा आकार लहान असतो. आई वडील घरट्याची व पिल्लांची विशेष काळजी घेतात. उडण्यापूर्वी पायांनी दिल्या जाणाऱ्या रेट्याने पिलांना इजा किंवा घरट्याचे नुकसान होऊ नये म्हणून ते बाहेरच्या फांदीवर येउन झेप घेतात.














खाणे झाल्यावर पिल्ले घरट्यात बसुन राहतात. फेब्रुवारी मार्च चे दिवस असल्यामुळे वारा वहात होता. निलगिरीचे लवचिक झाड डोलत होते. शेंड्याच्या जवळ असलेले घरटे खूप जोराने हेलकावत होते. ते मजबूत पणे बांधले गेले होते. पुष्कळदा कावळ्याच्या घरट्यावर हे ससाणे डल्ला मारतात. त्याची डागडुजीकरुन स्वत: वापरायला घेतात. त्यामुळे कावळे आणि तुरुमती ससाणे यांच्या मधे वैर असते. हे घरटे असेच एका कावळ्याकडुन हिसकावुन घेण्यात आले असावे.



















सकाळ्च्या वेळी पिल्ले सहसा झोपलेली असतात. पिले उठुन हलु लागली की मग पालक शिकार घेउन येतात. सामन्यपणे हे पक्षी शिकार पायात पकडतात, पण घरट्यात प्रवेश करताना ते शिकार चोचीत उचलून घेतात. पिलांना इजा होऊ नये याची खबरदारी ते प्रत्येक वेळा घेत असतात. भक्ष्याचा मेंदू हा फार पोषक व प्रथिनयुक्त असतो, म्हणून पालकच तो खातात. व शिर नसलेले धड घरट्यात घेउन येतात.




















सामन्यत: पक्षांच्या पिलांमधे खाण्यासाठी स्पर्धा असते. पण आम्हाला इथे वेगळाच प्रकार दिसला. पिलांमधे इर्षा अजिबात नव्हती. पहिल्या पिलाचे खाणे होइ पर्यंत दुसरे शांत होते व नंतर ते एका नियोजित जागेवर जाउन बसले, मग आईने त्या पिलाला भरवायला सुरु केले. पिलांना त्रास न होता पालक भक्ष्य सोलुन खायला देत असतात. पिले आता दोन आठवड्याची झाली होती. त्यांची भूक वाढली होती. पचनशक्ती पण पूर्ण विकसित झाली होती, त्यामुळे पालक त्यांना भक्ष्याचा पाय देखील भरवत होते.
जशी जशी पिल्ले मोठी होत जातात तसा तसा शिकार करुन आणल्या जाणाऱ्या भक्ष्याचा आकार पण मोठा होत जातो. छोट्या आकाराची शिकार अनेक वेळा करण्यापेक्षा मोठया आकाराची शिकार एकदा करणे ह्यांच्या साठी किफायतशीर असते. बऱ्याच वेळा अर्धमेली शिकार घरट्यात आणून पायने दाबुन मारली जाते. हे जणू पिल्लांसाठी शिकारीचे प्रात्यक्षिकच असते. यामुळे पिल्लांना ताजे अन्न मिळते व अन्न कसे खावे हे पण त्यांना दिसते.














पालक जवळ नसताना आजुबाजुचे कावळे ह्या पिलांना खाण्यासाठी टपून असायचे, पण घरट्याच्या जवळ जाण्याची त्यांची हिम्मत होत नव्हती. आई वडील फक्त शिकारीच्या वेळेस घरटे सोडुन १०-१५ मिनिटासाठी जात असत. इतर वेळ जवळच्या झाडावर बसुन असत. आपल्या असहाय्य पिलांचे रक्षण करण्यासाठी पहिले २ आठवडे आई पिलांच्या सोबत घरट्यामधेच निजे. रात्र पडायच्या आत घरट्यात जाऊन ती घरट्याची स्वच्छता करते. घरटे साफ असणे फार गरजेचे असते, कारण घरट्यात पडलेल्या मांसावर परजीवी कीटाणू वाढू शकतात व ते पिलांसाठी प्राणघातक ठरु शकते.
रात्रीच्या थंडीपासुन पिलांचे संरक्षण करण्यासाठी आई त्यांना आपल्या पोटाखाली घेउन त्यांच्यावर पंखाची मायेची चादर पांघरते.

पहाट झाल्यावर आई वडील शेजारच्या झाडावर रात्रभर घरट्यात बसुन आखडलेले पायांचे, पंखांचे स्नायु ताणून त्याना व्यायाम देत असतात, पंखाची, पिसांची तपासणी करत असतात. इतर शिकारी पक्ष्यांप्रमाणेच तुरुमती ससाण्याची मादी, नरापेक्षा आकराने मोठी असते. पिले जागी झाली कि हे शिकारी साठी झेप घेतात.
ह्यांच्या शिकारी मधे चंडोल, लावरी, कोंबड्या, उंदीर, सरडे, पाली व क्वचित प्रसंगी वटवाघुळे आम्हाला आढळली.

पिल्ले आता ३ आठवड्याची झाली होती. पांढऱ्या रंगाची पिसे जाउन पंखावर करड्या रंगाची तर पोटावर लाल रंगाची पिसे आली होती. आता ही पिल्ले आई वडीलांनी दिलेला भक्षाचा पाय पण सहजपणे मटकावत होती. ससाणा अंडी घालताना एका दिवसाच्या अंतराने घालतो. अंड्यांच्या उबण्यामधे पण एका दिवसाचा फरक होतो. त्यामुळे एक पिल्लु मोठे असते तर दुसरे छोटे. हा फरक ३ ऱ्या आठवड्यातही दिसत होता.
कावळ्यांवर दहशत बसवण्यासाठी आई वडील दिवसातुन किमान ३-४ वेळा कावळ्यांचा पाठलाग करुन त्यांना हुसकावुन लावत होते.



















मार्च महिना संपत आला होता, मकर संक्रमण झाल्याने सुर्य आता प्रखरतेने आग ओकु लागला होता. सावरी ची बोंडे त्या उन्हामुळे तडकली जाउन कापुस व त्यासोबत बीजे आसमंतात इतस्त उडत होती. पांगाऱ्यावर सुद्धा एखाद दुसरे फूल उरले होते.
शेतीची कामे संपली असल्यामुळे खेड्यातली मंडळी जत्रांमधे गुंगली होती. वातावरण उत्साही होते. पण पिण्याचे पाणी मिळ्वण्यासाठी गावातील स्त्रियांना जीवावर उदार होऊन दिवसेंदिवस आटत जाणाऱ्या विहिरीत उतरावे लागत होते.
याच परिसरात असणाऱ्या सह्याद्रीच्या उपरांगांमधे कडे कपाऱ्यात घरटे करणारा जगातील सर्वात वेगवान पक्षी शाही ससाणा आपल्या पिलांना उड्ण्याचे धडे देत होता. हेच पिल्लु पुढे जाउन ताशी २०० मैल वेगाने उडणार होते.
अशाच एका डोंगरावरील एका ऊंच, अजस्त्र घरट्यात, ताकदवान, भक्कम पंजाचा, नाराच गरूड, आपल्या कापसाच्या गोंड्याप्रमाणे दिसणाऱ्या पिल्लांना मोठे करण्याच्या कामात गुंगला होता. अतिशय वात्सल्याने व नाजुकपणे पिल्लाना भरवताना याला पाहून, हाच का तो शिकारी गरूड ? असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.


वसंत ॠतु खऱ्या अर्थाने शिकारी पक्ष्यांसाठी नवजीवनाचा काळ असतो. पानगळ झाल्यामुळे नजरेचा टप्पा आणि स्पषटता वाढते. त्या मुळे शिकार करणे सोपे जाते, कदाचित याच कारणामुळे ते आपले प्रजनन या काळात करत असावेत.
आपले तुरुमती जोडपे देखील पिल्लांना वाढवता वाढवता चांगलाच दमून जात होते. पिल्ले आता ५ आठवड्याची झाली होती. ती जवळ जवळ आपल्या पालकांसारखीच दिसत होती. त्यांच्या मधे ससाण्याचे गुण उतरायला लागले होते. आपला हक्काचा घास ते जवळजवळ हिसकावुन घेत होते. आई पण तो घास तसाच न देता त्यानां खेचायला लावत होती, लचका तोडण्याचे प्रशिक्षण देत होती.
आम्ही अशी निरीक्षणे आळीपाळीने दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी घेत होतो.
पिले आता आपला वेळ पंखांचा व्यायाम करण्यात, पिसे साफ करण्यात घालवत होती. पंज्याने घरट्यात उरलेल्या भक्ष्याचा अवशेषाला उचलण्याचा सराव करत होती. पण अजुन ते कसब एवढे विकसित न झाल्यामुळे तो भाग पंजातौन पडुन जात असे व पिल्लांसमोर डोके खाजवण्याशिवाय काही पर्याय उरत नसे. पण हा त्यांच्या शिक्षणाचाच एक भाग होता.
पिले निलगिरीच्या पानातुन रस काढुन आपल्या पंखाना लावताना दिसत होती.
आता त्याना दूरवरचे क्षितीज साद घालत होते. त्यांच्या हालचालीत अस्वस्थता जाणवत होती.त्यांचे आपल्या पंखांवर नियंत्रण येत होते.
याच वेळी तुरुमती ससाण्याचा एक स्वभाव विशेष आम्हाला दिसुन आला. रणरण्त्या उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून ती भावंडे आळीपाळीने दुसऱ्याला आपल्या पोटाखाली घेत होती. प्रेमाचा केवढा सुंदर आविष्कार!!
तुरुमती ससाणे मोठे झाल्यावर जोडीनेच शिकार करतात, त्याचे मूळ बहुदा इथे दडले असावे.
उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी हि पिल्ले चोच उघडून धापा टाकीत.














या दरम्यान पालकांचा पिलांकडील ओढा कमी झालेला असावा. ते आपल्यातच गुंग झालेले दिसत होते.
आणि अचानक एक पिल्लु आकाशात झेपावले, आइ वडील त्याच्या पाठोपाठ गेले. दुसरे छोटे पिल्लू घरट्यात एकटे पाहुन कावळ्यांनी डाव साधला व ते पिल्लु घरट्यातुन खाली पाडले . रात्रभर आम्ही त्या पिल्लाला सुरक्षित ठेवले. सकाळी त्या झाडावर एक टोपली बांधुन आम्ही त्याला त्या टोपली मधे ठेवले.















पण ते तिथे न बसता थेट झाडाच्या शेंड्यावर गेले.एकट्या पिल्लाला किती धोके असतात हे त्या वेळी आम्हाला जाणवले. मोठ्या अणकुचीदार चोचीचा धनेश त्या पिल्लावर चाल करुन आला. पण ते पिल्लु लेचेपेचे नव्हते. त्याने पंख पसरवुन व जोरात ओरडुन प्रतिहल्ला केला, आणि धनेश त्याच्या आवेशाला घाबरुन हल्ला न करताच उडुन गेला. आणि याच क्षणी त्या पिल्लाचे निघड्या तुरुमती ससाण्यात रुपांतर झाले.
दुसऱ्या दिवशी दुपारी आई वडील मोठ्या पिल्लाला घेउन त्या झाडापाशी आले. आम्हाला हे सगळे एखाद्या हिंदी मसाला चित्रपटासारखे वाटत होते.
इतक्या दिवसांच्या निरीक्षणानंतर आमच्या लक्ष्यात आअले होते की तुरुमतीसाठी कोंबडीची लहान पिल्ले म्हणजे आयती शिकार आहे. सकाळी आणि संध्याकाळी गावकरी आपली कोंबडीची पिल्ले चरायला सोडतात. त्यापैकी जरा बाजूला पडलेल्या पिल्लावर हा ससाणा वीजेप्रमाणे कोसळतो व डोळ्याचे पाते लवते न लवते तो पिल्लाला उचलून गगनात दिसेनासा होतो.














पाळलेल्या कोंबड्या पळवणारा ससाणा पकडणे किंवा मारणे शक्य नसल्याने कडबा तोडावा एवढ्या सहजपणे हातातील कुऱ्हाड ससाण्याचे घरटे असलेल्या झाडावर चालवली जाते, आणि ससाण्याचे अस्तित्वच पुसण्याचा प्रयत्न होतो.एका वर्षानंतर त्याच ठिकाणी गेल्यावर आम्हाला ते झाड जमीनदोस्त केलेले दिसले.
त्या परिसराची छाननी केल्यावर आम्हाला दुसरा एक धक्का बसला. आनंद या गोष्टीचा होता की आपले वस्तिस्थान नष्ट झाले तरिही ससाणा त्या परिसरात दुसऱ्या ठिकाणी घरटे करत होता. पण दु:ख या गोष्टीचे होते की लोखंडाच्या निर्जीव, टणक, उन्हाने तापणाऱ्या, छायारहित टॉवरवर त्याला रहावे लागत होते. ज्याचे पाय व नखे झाडावर बसण्यासाठी विकसित झाले आहेत, त्याला चटके सहन करीत लोखंडी पट्ट्यावर उभे राहुन पिल्लांना भरवावे लागत आहे.




















अशीच वेळ लग्गड नावाच्या दुसऱ्या एका ससाण्यावर आल्याचे उदाहरण आम्हाला नजीकच आढळुन आले. अशाच एका मनोऱ्या वरील ऍण्टेना वर त्याने आपला संसार थाटला होता.



















पण या पर्यायी मानवनिर्मित जागेत आश्रय घेतल्याची किंमत या ससाण्यांना बऱ्याच वेळा आपला जीव गमावुन ( वीजेचा धक्का लागुन ) भरावी लागते.
हे सर्व बघुन
अश्या या प्रतिकूल परिस्थिती मधे अन्न साखळी च्या सर्वोच्च स्थानी असलेले ससाण्यासारखे शिकारी पक्षी किती दिवस तग धरु शकतील अशी चुटपुट मनाला लागुन राहते......


1 comment:

Amogh said...

khoop vaachaniya aahe tumche likhaN